नागपूर (पॉलिटिकल ब्युरो) : देशात अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही घटकांच्या असंतोषाला हवा देऊन तो घटक समाजापासून वेगळा आणि व्यवस्थेविरुद्ध आक्रमक बनवला जात आहे. त्यानंतर व्यवस्था, कायदा, शासन, प्रशासन याबद्दल अविश्वास आणि द्वेष वाढवून भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. काही लोक यासाठी राजकारणाचा उपयोग करत आहेत. देशहितापेक्षा स्वार्थाच्या राजकारणाला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. पर्यायी राजकारणाच्या नावाने आपली विनाशकारी कार्यसूची पुढे नेणे ही त्यांची कार्यपद्धती आहे, असा स्पष्ट इशारा सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी देत जातीपातीच्या आधारावर निर्माण होत असलेले भेद व त्यामाध्यमातून अराजकता पसरविण्याच्या प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शनिवारी ९९ वर्षे पूर्ण झाली. संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले. नागपूरच्या रेशीमबागेत आज, १२ ऑक्टोबरला सकाळी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव झाला. नागपुरात पाऊस असूनदेखील चिखल व पावसात उत्साह कायम होता. कार्यक्रमाला इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या गणवेशात उपस्थित होते. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे ही गुंडगिरी
सरसंघचालक म्हणाले, की जात, भाषा, प्रदेश या छोट्या वैशिष्ट्यांच्या आधारे सामान्य समाजाला वेगळे करून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्येही अचानक वाढ होताना दिसते आहे. परिस्थिती किंवा धोरणांबद्दल असंतोष असू शकतो, परंतु ते व्यक्त करण्याचे आणि विरोध करण्याचे लोकशाही मार्ग आहेत. त्यांचे पालन न करता हिंसाचार करणे, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वागण्याला ‘अराजकतेचे असे म्हटले आहे, याकडे सरसंघचालक म्हणाले.
देशाची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र
मागील काही वर्षांत जगात भारताचा दबदबा वाढला असून सशक्त देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. तरुणाईत स्वची भावना वाढीस लागली आहे. मात्र काही तत्व षडयंत्रे रचून यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणूनबुजून षडयंत्र रचण्यात आले आहे. असत्य किंवा अर्धसत्याच्या आधारावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सरसंघचालक म्हणाले. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त करत ते म्हणाले, की बांगलादेशमधील हिंदू समाजावर झालेले हल्ले हा गंभीर प्रकार होता. तेथील हिंदू समाज एकत्रितपणे समोर आला म्हणून काही प्रमाणात त्यांचा बचाव झाला.
मात्र जोपर्यंत तेथील अत्याचारी कट्टरपंथीय लोक सक्रिय आहेत तोपर्यंत हिंदूंसोबत अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने धोक्याची तलवार लटकत राहणार आहे. भारत सरकारने तेथील हिंदूंच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घ्यायला हवा. तेथे भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानसोबत हातमिळावणी करण्याच्या गोष्टी होत आहेत. यावर शासनाने लक्ष दिले पाहिजे. भारतातदेखील अवैध घुसखोरी सुरू असून त्यामुळे लोकसंख्येचे असुंतलन निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. हिंदू समाजाने संघटित होत सशक्त होणे ही काळाची गरज असल्याचे सरसंघचालक म्हणाले. स्वयंसेवकांनी विविध शारीरिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण यावेळी केले.