
मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवसेनेचाच म्हणाल तर तो शिवतीर्थावरचा मेळावा आहे. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येत आहेत. मेळावे करत आहेत. पण ज्या शिवसेनेची स्थापना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि प्रत्येक दसऱ्याला एक विचारांचं सोनं त्यांनी देशाला महाराष्ट्राला दिलं, ती उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली आहे, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केले.
मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे आज सायंकाळी पाचला होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, की दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक मेळावा होतो आणि मुंबईमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा दसरा मेळावा होता. तो परंपरेनुसार आज होईल. आता दसऱ्याला मेळाव्यांची लाट आली आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले. काही लोकांनी पक्षाचे चिन्ह आणि नाव चोरले असेल. तरीही विचार आणि जनता ही मूळ शिवसेनेच्या सोबतच आहे. निवडणूक आयोग ठरवू शकत नाही की शिवसेना कोणाची आहे. कारण निवडणूक आयोग काही दिवसांनी निवृत्त होईल आणि जो मोदी-शाहांच्या मेहरबानी वरच जगतो आणि चालतो.
शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा त्यांना अधिकार नाही. या राज्यातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मुंबईतील आजचा दसरा मेळावा हा उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, असे राऊत म्हणाले. आमचा धनुष्यबाण मोदी आणि शाह यांच्या मदतीने चोरण्यात आला. आज देश चोरांच्या हाती आहे असे म्हणावे लागेल. आमच्याकडे मशाल आहे ना. मशाल सुद्धा सगळ्यात मोठं हत्यार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात मशालीचा वापर फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शिवरायांपासून मशालीला महत्त्व आहे आणि तीच मशाल आज आमच्या हातात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.