मुंबई (पॉलिटिकल ब्युरो) : मनसेने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग दसऱ्याच्या मुहूर्तावर फुंकले आहे. बेसावध राहू नका, शमीच्या झाडावरील शस्त्रे आता उतरवा, ही क्रांतीची वेळ आली आहे. ही वचपा घेण्याची वेळ आहे, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले, की तुम्ही बेसावध राहाता आणि सर्व राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात. या सर्वात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली? केवळ रस्ते बांधणे आणि उड्डाणपूल उभे करणे ही प्रगती नसते. आपल्या हातात मोबाईल आला म्हणजे प्रगती नसते. प्रगती ही बुद्धीतून व्हावी लागते. प्रगती ही समाजाची होणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून प्रगतीच्या थापा मारून देखील तुमच्यातला राग व्यक्त होत नाही. त्याच – त्याच लोकांना का वारंवार निवडून दिले जाते. पांडवांनी जशी शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती तशी आणि मोक्याच्या वेळेला तुम्ही तुमची शस्त्र झाडावर नेऊन ठेवत आहात. मतदानाच्या दिवशी या शास्त्राचा वापर करायला हवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. निवडणुका संपल्यानंतर तुम्ही शस्त्र बाहेर काढता आणि या सर्व लोकांवर बोलत राहतात. मग मतदानाच्या दिवशी काय होते? असा सवाल त्यांनी केला.
हा माझ्या जातीचा, हा माझ्या ओळखीचा, असे जर करत बसला तर राष्ट्र उभे राहत नाही. आजपर्यंत तुम्ही सर्वांना संधी दिली आहे. या निवडणुकीत मतदारांनी क्रांती करायला हवी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. गेली पाच वर्षे तुमच्या मतांशी ज्यांनी प्रतारणा केली, ज्यांनी मतांचा अपमान केला, ज्यांनी तुम्हाला गृहीत धरले, वेडी वाकडी युती आणि आघाड्या करत बसले. ते आज संध्याकाळी मेळाव्यातून एकमेकांची उणीदुणी काढतील. मात्र, त्यांच्यात मतदार कुठे असेल? महाराष्ट्र कुठे असेल? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मी अनेक वर्षापासून एका महाराष्ट्राचे स्वप्न पाहतोय. त्यासाठी संधी देण्याची विनंती राज ठाकरे यांनी केली.