जळगाव (पॉलिटिकल ब्युरो) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट देणार असल्याचे सांगत गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मते त्यांच्या पत्नीला मिळतील, अशी स्पष्टोक्ती केली.
जामनेर येथे शिवसृष्टी व भीमसृष्टी स्मारक अनावरण सोहळ्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. गिरीशभाऊ तुम्ही यावेळी लढून घ्या, २०२९ मध्ये तुम्हाला तिकीट देणार नाही. २०२९ मध्ये साधना वहिनीच (गिरीश महाजन यांच्या पत्नी) निवडणूक लढणार, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांना पाडणार असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र, ते शक्य नसून गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मतं केवळ साधना महाजन याच घेऊ शकतात, असे फडणवीस म्हणाले.
जामनेर तालुक्याचे शिल्पकार गिरीश महाजन यांनी गेल्या ३० वर्षांत शहराचाच नव्हे तर जामनेर तालुक्याचा केलेला विकास हा वाखणण्याजोगा आहे. गिरीश महाजन हे साधेसुधे नसून अस्सल हिऱ्यासारखे आहेत. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही जामनेरकरांची असेल. त्यांना कोणीही येथे पराजीत करू शकत नाही. त्यांची कामे करायची सचोटी असल्याने महाजन यांना संकटमोचक म्हणून संबोधित केले जाते, असेही फडणवीस म्हणाले.